मंत्री आदित्य ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे राष्टीय स्मारकाच्या अध्यक्षपदी नियक्ती
मुंबई : हिंदूहृदय सम्राट तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी शिवाजी पार्क दादरमधील महापौर बंगला या जागेची निवड केली आहे. या स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार २७ सप्टेंबर २०१६च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन केली होती. २५ नोव्हेंबर २०१९च्या पत्रानुसार उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होतात्यामुळे हे अध्यक्षपद रिक्त झाले होते. १३ मार्च २०२० रोजी या अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,” असे या निर्णयात नमूद केले आहे. तर न्यासाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देण्यात आली आहे.